ऑक्सिजन टाकीत ६ महिन्यापासून साठाच नाही, कुर्ला भाभा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!

१ किलोलीटरचे क्षमतेची २ यंत्रे बसविण्यात आली असून दोन्ही मिळून २५० जंबो सिलेंडर इतकी क्षमता तयार होईल जी १५ दिवस योग्य रीतीने सुरु राहील. मागील आठवड्यात भाभा रुग्णालयातून ३५ लोकांना अन्य ठिकाणी स्थालांतरण करण्याची नामुष्की आली.

    कुर्ला भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी ६ महिन्यापासून तयार असून त्यात लिक्विड ऑक्सिजनचा साठा न भरल्यामुळे केलेल्या खर्चाचा उपयोग झालाच नाही. यामुळे ही ऑक्सिजनची टाकी उपयोगात येत नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांसकडे केली आहे.

    मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कुर्ला भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबतीत १२ जून २०२० रोजी वैद्यकीय अधीक्षक यांसकडे बैठक आयोजित झाली होती. १ किलोलीटरचे क्षमतेची २ यंत्रे बसविण्यात आली असून दोन्ही मिळून २५० जंबो सिलेंडर इतकी क्षमता तयार होईल जी १५ दिवस योग्य रीतीने सुरु राहील. मागील आठवड्यात भाभा रुग्णालयातून ३५ लोकांना अन्य ठिकाणी स्थालांतरण करण्याची नामुष्की आली. ही व्यवस्था सुरु झाली असती तर नागरिकांना आणि डॉक्टर मंडळींना झालेला मनःस्ताप आपण थांबवू शकलो असतो. हे सांगत अनिल गलगली यांनी प्रश्न उपस्थित केला की सर्व काही तयार आहे मग ऑक्सिजन टाकी कार्यान्वित का होत नाही?

    आमदार मंगेश कुडाळकर यांनी सोमवार, २६ एप्रिलला ऑक्सिजन टाकीच्या कार्यान्वयन बाबतीत वैद्यकीय अधीक्षक डॉ उषा शर्मा यांची भेट घेतली. यावेळी अनिल गलगली, किरण दामले, आशिष पटवा, शाखाप्रमुख कमलाकर बने उपस्थित होते. कार्यान्वयन बाबतीत पालिका अधिकारी कृष्णा पेरिकर यांच्याशी चर्चा झाली असून ५ दिवसात कमिशनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.