पहारे गावाला २५ वर्षे नाही सरपंच, गावाची अवस्था दयनीय

शरद  धुमाळ, भिवंडी: भिवंडी तालुक्यात पहारे गावात तब्बल गेल्या २५ वर्ष सरपंच नसल्याने गावची विकासकामे ठप्प झाल्याने दयनीय अवस्था झाली  आहे. गावात एकही आदिवासी नसतानासुद्धा १९९५ मध्ये या पहारे गावाला आदिवासी सरपंच आरक्षण पडले. मात्र या गावात एकही आदिवासी नसल्याने सरपंचाची खुर्ची आजही रिकामी असल्याने  या गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खड्डेमय रस्ते आहेत.रस्त्यावरून ये जा करताना जीव मुठीत धरावा लागतो  तर पिण्याच्या पाण्याची टाकी २५ वर्ष पडून आहे. त्यामुळे बोअरवेलचे विकत पाणी  गावकऱ्यांना घ्यावे लागत असून १० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची शाळा पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आजही  कायम आहे . त्याच प्रमाणे विजेचे खांब वाकलेले आहेत. वीजतारा तुटलेल्या आहेत, पथदिवे नाहीत.  गटारेसुद्धा नाहीत अशा विविध समस्या असल्याने सरपंचाचे आरक्षण हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

आमच्या पहारे गावाला सरपंच नसल्याने ग्रामसेवक काम पाहतात मात्र त्यांच्याकडे दोन गावांची कामे असल्याने ते १५ दिवसांनी किंवा महिन्याने ते इथे येतात. त्यामुळे कामे होत नाही, गावचा विकास होत नाही गावची सर्वच कामे  पूर्णपणे ठप्प असल्याने गावची प्रगती होत नाही. त्यासाठी शासनाने आरक्षण हटवणे गरजेचे आहे.
                                                                                                                   – भरत भोईर, पोलीस पाटील, पहारे 

आमच्या गावच्या रस्त्यावर सर्वत्र  खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. महत्वाची बाब म्हणजे २५ वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधली मात्र आजपर्यंत या टाकीत पाणीच नसल्याने गावकऱ्यांना पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी घ्यावे लागत आहे. आमच्या गावात आदिवासी नसताना आरक्षण लादून आमच्या वर गुन्हाच लादला आहे. त्यामुळे शासनाने  आरक्षण हटवून आमच्या गावाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती.
                                                                                                              – पुंडलिक पाटील, माजी सरपंच, पहारे