‘भिवंडी शहरातील आयजीएम रुग्णालयात नॉन कोव्हिड रुग्णालय लवकरच होणार सुरू’

भिवंडी : भिवंडी शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील एकमात्र शासकीय आयजीएम रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने शहरातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत नसल्याने आयजीएम रुगणालायत १०० बेडचे नॉन कोव्हिड रुग्णालय बनविण्यात येत असून येत्या आठवड्याभरात त्याचे काम पूर्ण होऊन ते नागरीकांच्या सेवेत असेल,असा विश्वास डॉ नितीन मोकाशी यांनी व्यक्त केला आहे .

भिवंडी या दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या शहरात आरोग्य व्यवस्थेचा बट्याबोळ उडाला असताना आरोग्य सेवेतील राजकारणाला कंटाळून शासकीय सेवेला सोडचिठ्ठी दिलेल्या भिवंडी शहरातील ख्यातनाम शल्य चिकित्सक डॉ. नितीन मोकाशी यांच्यावर शासनाने कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष जबाबदारी सोपवित त्यांची नियुक्ती भिवंडी महानगरपालिका मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदावर केली .डॉ. नितीन मोकाशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाची झाडाझडती घेत आरोग्य विभागात सुधारणा करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी शहरातील आरोग्य सेवा सुसज्ज करण्यासाठी ती सुरुवात केली आहे.

 भिवंडी शहरातील एकमेव शासकीय रुग्णालय म्हणूनओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर कोव्हिड रुग्णालयात केल्याने सध्या शहरातील रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले असल्याने डॉ नितीन मोकाशी यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडच्या कोव्हिड रुग्णालयाव्यतिरिक्त १०० बेडचे नॉन कोव्हिड रुग्णालय बनविण्यास सुरुवात केली आहे .

सध्या आयजीएम रुग्णालयातील रुग्ण सेवेचा भार ऑरेंज या खाजगी रुग्णलयावर सोपविण्यात आला असून ऑरेंज रुग्णालयास त्यासाठी शासन भाड्यापोटी लाखो रुपये देत असतानाही आरोग्य सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने नागरीकां कडून ओरड होत असून शासकीय रुग्णालयात महिन्याकाठी ४०० ते ४५० महिलांचे बाळंतपण होत असताना ऑरेंज रुग्णालयात ती संख्या रोडावली असून २०० पर्यंत येऊन ठेपली आहे .त्यामुळे शहरातील गरीब गरजू महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आयजीएम रुग्णालयात १०० बेड चे नॉन कोव्हिडं रुग्णालय सुरू केल्याने नागरीकांना त्याचा फायदा होणार असून त्या सोबतच महानगरपालिका क्षेत्रातील १५ नागरी आरोग्य केंद्रात सध्या फक्त लसीकरण कार्यक्रम राबविला जात असून त्या सर्व ठिकाणी प्रत्येकी १० बेडची व्यवस्था करून त्यापैकी ५ बेड बाळंतपणासाठी राखीव व ५ बेड सर्वसामान्य आजारा साठी राखीव राहणार असून नागरीकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यास आयजीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागा सह इतर आरोग्य सेवेवरील भार कमी होण्यास मदत होईल व नागरीकांना ते सोयीचे होईल, असा विश्वास डॉ नितीन मोकाशी यांनी शेवटी व्यक्त केला .