झोपडपट्टी व चाळ परिसरात १५ दिवसांत सापडला नाही एकही कोरोना रुग्ण

कल्याण  : मागील ४ महिन्यांपासून कोरोनाच्या सावटात वावरणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडणाऱ्या  तब्बल ४५ परिसरांमध्ये मागील १५ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचे कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.  

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार पार गेली असतांनाच गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाली आहे.  यामुळे प्रशासनाचा हुरूप वाढला आहे. कोरोनामुक्त झालेल्या परिसरात क्रांतीनगर, ज्योतीनगर यासारख्या मोठ्या झोपडपट्ट्याचा समावेश असून हे भाग हॉटस्पॉटमधून वगळण्यात आल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

सध्या दिवसाला ७०० अॅन्टीजेन टेस्ट केल्या जात असून आतापर्यत ८३८१ एकूण टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच फमिली डॉक्टर कोव्हीड फायटर संकल्पनेला खाजगी डॉक्टराचा चांगला प्रतिसाद मिळत असून खाजगी डॉक्टरांनी आतापर्यत ४३००  तापाचे रुग्ण अन्टीजेन टेस्ट साठी पाठवले असून या डॉक्टरांना यापुढे देखील तापाचे रुग्ण अन्टीजेन टेस्ट साठी पाठवावेत असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आतापर्यत पालिका क्षेत्रातील ५७ हजार ८२८  टेस्ट करण्यात आल्या असून यातील ४९ हजार ४९०  स्वॅब टेस्टिंग करण्यात आले असून स्वॅब टेस्टिंगचे प्रमाण ८६ टक्के असून अन्टीजेन टेस्टचे प्रमाण १४ टक्के इतके आहे. दरम्यान प्रशासनाकडून दिवसाला एक हजार अंटीजेन आणि १५०० स्वॅब टेस्टिंग करत कोरोना शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.