संपूर्ण मालमत्ता कर भरणाऱ्यांना आता कल्याण डोंबिवली पालिकेकडून ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार ५ टक्के सवलत

 कल्याण : संपूर्ण  मालमत्ता कर भरणाऱ्यांना करदात्यांना मालमत्ता करात ५टक्के सवलत प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत जाहीर केली होती. या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा  होण्यासाठी आता प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ केली आहे. मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम रोख/ऑनलाईन/धनादेश या माध्यमाद्वारे आर्थिक वर्षाच्या ३१ जुलैपर्यंत भरणाऱ्या करदात्यास मालमत्ता करात ५ टक्के सवलत देण्यात आली होती. ही सवलत ३१ जुलै २०२० ऐवजी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तरी महापालिकेच्या करदात्यांनी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

सध्याची कोव्हिडची परिस्थिती पाहता नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी मालमत्ता कराच्या देयकाचा भरणा ऑनलाईन करावा, ज्या नागरिकांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, अशा नागरिकांनी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन दिवशी व वेळी रोख/धनादेशाद्वारे मालमत्ता कराची रक्कम जमा करावी. मालमत्‍ता कर विहीत वेळेत जमा न केल्यास २ टक्‍के व्याज आकारले जाईल, तरी मालमत्‍ता कर विहीत वेळेत जमा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.