कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कल्याण डोंबिवली आयुक्तांच्या सूचना

कल्याण : कोरोना पार्श्वभूमीवर हा गणेशोत्सव प्रबोधनात्मक व आदर्श गणेशोत्सव म्हणून साजरा करुया, असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. महापालिका मुख्यालयात प्रभाग क्षेत्र अधिकारी, पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे सदस्य यांच्यासमवेत सार्वजनिक गणेशोत्सवा संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये ते बोलत होते.

यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सुचना दिलेल्या असून त्यामध्ये सार्वजनिक मंडळांकरीता गणपतीची मूर्ती ४ फूट व घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांची असावी, त्या अनुषंगाने मंडपांचा आकारही छोटा असावा, तसेच मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम/उपक्रम घेण्यात यावेत, या शासनांच्या सूचनांचे पालन करावेत असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. अनेक गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांनी नागरिकांचे घरोघरी जाऊन स्क्रिनींग करुन महापालिकेस सहकार्य केले याबाबत त्यांचे आयुक्तांनी आभार मानले.

गणेश मंडळांनी श्री गणेश दर्शनासाठी सुविधा शक्यतोवर ऑनलाईन, फेसबुक, इंटरनेटद्वारे, केबल नेटवर्कद्वारे उपलब्ध करुन दयावी, शासनाच्या सूचनांनुसार गणेश मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची व थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी, मास्क परिधान करणे बंधनकारक करावे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिसरात महापालिकेच्या मदतीने फिव्हर कॅम्प व ॲन्टीजेन टेस्ट आयोजित कराव्यात असेही यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाचे आकडे सध्या कमी झाले दिसत असले तरी नागरिकांनी उत्सवा दरम्यान बाहेर पडू नये, गर्दी करु नये, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

गणेश मंडळाच्या परवानगीसाठी , पोलिस स्थानकात एक खिडकी योजना राबविली असून तेथे महापालिकेचे कर्मचारी नियुक्त राहतील, महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव मंडळांनी १२ ऑगस्टपर्यंत परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  गृहनिर्माण संस्थांनी शक्यतोवर त्यांच्या आवारामध्येच गणेश विसर्जनाची सोय करावी अथवा महापालिका राबवित असलेल्या ‘विसर्जन आपल्या दारी’  या मोहिमेत आपले गणपती महापालिकेने उभारलेल्या यंत्रणेकडेच जमा करावेत, असे पालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले. या ऑनलाईन बैठकीमध्ये महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी असे मिळून ९९ जणांनी सहभाग घेतला होता.