कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत शांततेत बकरी ईद साजरी

भिवंडी : मागील पाच महिन्यांपासून देशात आणि महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने सर्व धार्मिक स्थळे बंद करून सार्वजनिक ठिकाणी एकत्रित होण्यास मनाई केली गेली असताना मुस्लिम धर्मियांची पवित्र अशी ईद उल अजहा अर्थातच बकरी ईद भिवंडी शहरात अत्यंत साधेपणाने व शांततेत साजरी करण्यात आली .

मशिदी बंद असल्याने व कुर्बानीसाठी कुर्बानी सेंटर बनविण्यात न आल्याने शहरातील मुस्लिम धर्मियांनी घरातच पवित्र अशी नमाज प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या घराच्या परिसरातच बोकडांची कुर्बानी देण्यास सुरुवात केली आहे .यानिमित्त पोलीस प्रशासनाने शहरात चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून शहरात कुर्बानीनंतर निर्माण होणारे अपशिष्टे गोळा करण्यासाठी ५० घंटागाड्यांसह ४० खाजगी टेम्पो व ८ डंपर तैनात ठेवण्यात आले असून अपशिष्टे गोळा करण्यासाठी १५० बारदान , १०० ताडपत्री व ३०० मजूर तैनात ठेवण्यात आले आहेत. गोळा झालेले अपशिष्टे ईदगाह येथील सॉल्टर हाऊसमागे नष्ट करण्यासाठी पोकलन व जेसीबीची व्यवस्था करून चोख अशी व्यवस्था महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरात करण्यात आली आहे .