मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना एसटीतील महिला कामगारांचे साकडे

आधीच तोट्यात रुतलेले राप महामंडळाचे चाक covid-19 च्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे. फक्त जिल्हा अंतर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत सुरू आहे.

सुतारवाडी : आधीच तोट्यात रुतलेले राप महामंडळाचे चाक covid-19 च्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे. फक्त जिल्हा अंतर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत सुरू आहे. यामुळे फक्त बावीस प्रवाशांची वाहतूक होत असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबले आहेत. त्याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्य यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना मदतीची विनंती केली आहे. 

राखी पौर्णिमाच्या भाऊ-बहिणीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील निर्भया सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. वेतनाचा प्रश्न त्वरीत सोडवावा ही ओवाळणी या मंत्रीमहोदयभावांनी निर्भयांना द्यावी अशी मागणी केलेली आहे.

प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवणार आहेत अशी माहिती राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी दिली.  या निवेदनाची दखल त्वरित घेतली जावी ही विनंती सर्व महाराष्ट्रातील निर्भया  आपल्या कुटुंबासहित करीत आहेत असे शीला नाईकवाडे यांनी सांगितले आहे.

रायगड विभागातील प्रमुख निर्भया सदस्या श्रीमती घोलप मॅडम व त्यांच्या महिला सहकार्यांनी सुद्धा मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व मा.परिवहनमंत्री यांना निवेदन पाठविलेले असुन याबाबत वरील सर्व मंत्रीमहोदय सकारात्मक प्रतिसाद देतिल हा आम्हाला दृढविश्वास आहे असे मत विभागीय अध्यक्ष श्री विलास खोपडे, विभागीय सचिव श्री गणेश शेलार यांनी व्यक्त केले.