कोरोनामुळे इतर रोगांचे प्रमाण झाले कमी – डॉ. गुणे

पनवेल : कोरोनामुळे हृदय विकार आणि संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र कोरोना(corona) कधी संपेल हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मॉलमध्ये खरेदीसाठी येताना स्वतःची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. हात सॅनिटायझ करावेत. मॉलने दिलेल्या नियम व अटींचे पालन करून खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आज कोरोना योद्धा डॉ.गिरीश गुणे यांनी पनवेल शहरातील नामांकित ओरियन मॉल(orion mall) पुन्हा सुरु करताना केले.
यावेळी  डॉ.गिरीश गुणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल दोडिया आदी उपस्थित होते. शासनाने व पनवेल महानगरपालिकेने मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यावर आज शहरातील नामांकित डॉ.गिरीश गुणे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते ओरियन मॉल पुन्हा सुरु करण्यात आला.

यावेळी बोलताना गिरीश गुणे यांनी सांगितले की, पनवेल(panvel) परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने आगामी काळात या रोगाला प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे लहान मुले शाळेत व घराबाहेर जात नसल्याने पावसाळयात होणार्‍या संसर्गजन्य रोगापासून त्यांचा बचाव झाला आहे. नोकरदारवर्ग बाहेर कामाला जात नसल्याने त्यांचा ट्रेस कमी झाल्याने या काळात हृदयविकाराचे प्रमाण ही कमी झालेले दिसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले यांनी आज सहा महिन्यानंतर प्रथमच एका कार्यक्रमासाठी बाहेर पडल्याचे सांगून पनवेलकरांचे आभार मानत कोरोनाशी दोन हात करताना पनवेलकर सतर्क आहेत व योग्य ती काळजी घेत असल्या बद्दल समाधान व्यक्त केले . मात्र आपल्याला लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत म्हणजे आपण लवकर या रोगातून मुक्त होवू. या रोगामुळे घेत असलेल्या खबरदारीने इतर आजारसुद्धा कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी या दोन्ही कोविड योद्धांच्या कामगिरीचे कौतुक केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या दोन्ही योद्ध्यांनी रुग्णसेवा केल्याचे त्यांनी सांगितले. या मॉलवर १४०० कामगारांचे भवितव्य व त्यांचे पोटपाणी अवलंबून आहे. त्यामुळे बुधवारी मॉल उघडण्याची परवानगी मिळाल्यावर धाडसाने मॉल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला घेऊन आजपासून सर्व पनवेलकर व इतर परिसरातील नागरिकांसाठी ओरियन मॉल खुला झाल्याचे त्यांनी सांगितले.