संगीत मार्तंड हरपला !  पद्मविभूषण पंडित जसराज यांचे निधन

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अमेरिकेत वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाचे वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यूज जर्सी येथे त्यांचं निधन झालं. पंडित जसराज शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते.  .स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे आणि ‘जसरंगी जुगलबंदी’ या आगळ्या वेगळ्या गायन प्राकाराचे संगीतसृष्टीला योगदान देणारे मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख  होती.  भारत सरकारने संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल २००० साली त्यांना  पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. 

 

संगीत क्षेत्रातील कामगिरीमुळे लघुग्रहाला ‘पंडित जसराज’ यांचं नाव

पंडित जसराज हे भारतीय शास्त्रीय गायनातील संगीत मार्तंड होते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (आयएयू)  २३ सप्टेंबर २०१९ या दिवशी मंगळ व गुरू या दोन ग्रहांदरम्यानच्या २००६ व्हीपी (३००१२८) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव दिले होते.  असा सन्मान मिळणारे पंडित जसराज हे पहिलेच भारतीय संगीत कलाकार ठरले आहेत.