पनवेल पोलिसांनी पकडले बार्शीतील गरिबांचे लाखो रुपयांचे रेशनचे धान्य

पनवेल : शासनाने कोव्हिड -१९ मध्ये सोलापूर जिल्हयातील बार्शी येथील  गोरगरिबांना देण्यासाठी दिलेले रेशनवरील ११० टन धान्य पनवेलजवळील पळस्पे येथील टेक केअर लॉजीस्टिकमध्ये  छापा टाकून पोलिसांनी पकडले असून त्याची किंमत ३३ लाख ८ हजार रुपये असल्याचे समजते. यामुळे शिवशाहीतील रेशनवरील धान्याचा काळा बाजार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई परिमंडळाचे उपायुक्त अशोक दुधे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस आयुक्त संजीवकुमार , सह आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अशोक दुधे , पनवेल शहारचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांचे सहकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ३१ जुलै रोजी  टेक केअर लॉजिस्टिक , पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे पंचासमक्ष छापा टाकला असता सोलापूर जिल्हयातील बार्शी येथे  शासनाने कोव्हिड -१९ मध्ये  गोरगरिबांना देण्यासाठी दिलेले रेशनवरील धान्य चार कंटेनरमधून  जमा करून आणून त्यामध्ये भेसळ करून विक्री करण्यासाठी साठा केलेले आढळून आले .

यामध्ये रेशनिंग तांदळाच्या एशियन राईस लोगो असलेल्या ३३ लाख ८ हजार किमत असलेल्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २२२० गोणी ( ११० टन ) , फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया , गव्हर्मेंट ऑफ पंजाब  आणि हरयाणा असे नाव असलेल्या गोण्या आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे सापडले. या प्रकरणी आरोपी  भीमाशंकर  खाडे , इकबाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक.पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत , उप निरीक्षक दीपक कादबाने , पोलीस हवालदार नितीन वाघमारे , पंकज पवार , पो.ना. गणेश चौधरी , महसूल विभागाचे  सर्कल  संतोष पाटील ,पुरवठा शाखेच्या अर्चना घरत , तलाठी तेजराव तवर सहभागी झाले होते. पुढील तपास परिमंडळ २ चे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांचे मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत करीत आहेत.