श्रीवर्धन परिवहन आगाराच्या स्वयंघोषित वेळापत्रकामुळे प्रवासी संभ्रमात

श्रीवर्धन: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन(shreewardhan) आगाराचा कारभार सध्यातरी हेलकावे खातच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण श्रीवर्धन परिवहन आगाराच्या(shreewardhan st depot) स्वयंघोषित वेळापत्रकामुळे (timetable)लांब पल्ल्याच्या फेर्‍यांच्या सुटण्याच्या वेळेवर प्रवासी मात्र संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

श्रीवर्धन आगारातून कोणती बस फेरी पनवेल, मुंबई किंवा बोरिवली किंवा नालासोपारा तसेच पुणे येथे सोडण्यात येते याचे कोणतेही ठोस वेळापत्रक श्रीवर्धन परिवहन आगाराकडे नसल्याने प्रवासी मोठ्या शहरांकडे खाजगी वाहनाने जाणे पसंत करत आहेत. श्रीवर्धन आगारातून मुंबई, पुणे किंवा नालासोपारा, बोरीवली या मार्गावर नियमित बस सुटतात याची माहिती स्थानिक पत्रकारांना देणे आवश्यक आहे. जेणेकरून या ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये गाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांपर्यंत पोहोचेल. तसेच श्रीवर्धन अलिबाग, श्रीवर्धन महाड, श्रीवर्धन माणगाव या अंतरजिल्ह्यातील बसफेऱ्या सुरू आहेत किंवा नाही याबाबत प्रवाशांना कोणत्याही सूचना प्राप्त होत नाहीत.

संपूर्ण देशामध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्व व्यवहार आता सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणची खाजगी कार्यालये, कंपन्या आता सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपासून आपल्या गावी आलेल्या चाकरमान्यांना आता मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी एसटी बसेसची आवश्यकता भासणार आहे. श्रीवर्धन ते पुणे अंतर फक्त एकशे साठ किलोमीटर असल्याने पुणे शहर त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पर्यटक श्रीवर्धन, हरिहरेश्वर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु या मार्गावरती साधी बस चालू असल्याने अनेक प्रवाशांचे हाल होतात. तरी पर्यटकांसाठी श्रीवर्धन आगाराने शिवशाही बस श्रीवर्धन पुणे मार्गावर चालू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. श्रीवर्धन परिवहन आगारात नव्याने रुजू झालेले आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी ज्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू आहेत किंवा सुरू असलेल्या बंद होणार आहेत, याबाबत वेळोवेळी पत्रकारांना माहिती दिल्यास प्रवाशांचा संभ्रम दूर होईल व सर्वांना सोयीचे जाईल.