कोरोनाची लक्षणे नसलेल्या रूग्णांची तपासणी केंद्रात गर्दी, सुविधांचा अभाव

वर्धा: प्रसुती व विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रूग्णांना अॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती खासगी रूग्णालयाचे वतीने करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा रूग्णालयाव्दारे केसरीमल कन्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोविड -१९ च्या अॅन्टीजेन तपासणी केंद्रात लक्षणे नसलेल्या रूग्णांची गर्दी होत आहे. केंद्रावर रूग्णांकरिता सुविधा नसल्याने रूग्णांचे हाल पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकाळात अनेक रूग्ण कोविड -१९ शिवाय इतर आजाराने ग्रस्त आहे. या रूग्णांना उपचाराकरिता खासगी किंवा शासकीय रूग्णालयात जावे लागते. विशेषता ज्या महिलांची प्रसुती होणार आहे. त्या शासकीय रूग्णालयात प्रसुती न करता खासगी रूग्णालयात सेवा घेत आहे. त्यांना खासगी रूग्णालयाच्या वतीने अॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती करण्याचा सल्ला दिल्या जात आहे. सोबतच ज्या रूग्णावर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यांनाही अॅन्टीजेन टेस्टची सक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या आरोग्य विभागाव्दारे सूचित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांना १४ दिवसांत कोविडचे लक्षण आढळल्यास, कोविड प्रयोगशाळेत काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस लक्षणे असल्यास, कोविड संक्रमित असलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या, सारी सारखे लक्षणे असणाऱ्यांसाठी, कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कात आणि ५ ते १० दिवसांत लक्षणे आढळल्यास, ज्या भागात कंटेनमेंन्ट झोन आहे, त्या भागातील ज्यांना सर्दी, खोकला व ताप आला आहे. त्यांचीच अॅन्टीजेन तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसुती किंवा आकस्मिक रूग्णांना गरज भासल्यास त्यांचेवर अॅन्टीजेन टेस्टची सक्ती न करता त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे. परंतु, खासगी रूग्णालयात उपचारासाठी जाणा-या प्रत्येक रूग्णांस अॅन्टीजेन तपासणी करण्याची सक्ती करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वतीने कसेरीमल कन्याशाळेतील अॅन्टीजेन तपासणी केंद्रावार चांगलीच गर्दी होत आहे. या तपासणी केंद्रावर रूग्णांकरिता सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे चांगलेच हाल होत आहे.
केंद्राला भेट दिली असता याठिकाणी दररोज १०० च्या जवळपास रूग्ण अॅन्टीजेन टेस्टसाठी येत आहे. केंद्रावर सुविधांचा अभाव दिसून आला. रूग्णांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. एकीकडे सॅनिटायझेशन शिवाय कुठेही प्रवेश नसतांना या केंद्रावर मात्र सॅनिटायझेशन करण्याचे कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. पिण्याचे पाणी किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाय करण्यात आले नाही. वारंवार सूचना देवुनही तपासणी करण्यासाठी येणारे रूग्ण सामाजिक अंतराचे पालन करीत नाही. त्यांना समज देण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. शासकीय रूग्णालयात अनेक प्रकारचे रूग्ण येत असल्याने अॅन्टीजेन तपासणी केंद्र केसरीमल कन्या शाळेत सुरू करण्यात आले. केंद्राकरिता स्वतंत्र गेट उपलब्ध आहे. परंतु, अमृत योजनेच्या ढिसाळ कामामुळे गेट बंद करण्यात आले आहे. यामुळे केंद्रात कुठुन प्रवेश करावा, असा प्रश्न रूग्णांना पडत आहे. शाळेच्या मुख्य गेटमधून फेरा मारून रूग्णांना तपासणी केंद्रात जावे लागत आहे.

अॅन्टीजेन तपासणी करण्यासाठी येणा-यांमध्ये गर्भवती महिलांची संख्या अधिक आहे. या तपासणी केंद्रात अॅन्टीजेन तपासणी व्यतीरिक्त कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध नाही. यामुळे गर्भवती महिलांची प्रकृती बिघडल्यास त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपम हिवलेकर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत व्यस्त असल्याने प्रतिक्रिया देवु शकले नाही