महाड तालुक्यासाठी कायमस्वरुपी एनडीआरएफ टीम- मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

महाड  : एनडीआरएफ(ndrf) टीम महाड (mahad) येथे कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात आणि महाड शहरालगत सावित्री नदीत वाढलेले जुट्टे काढण्यासाठी आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी लेखी निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज गणरायाचे दर्शन घेताना रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले(bharat gogavale), महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे तसेच रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे,तसेच पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद शेठ भोकरे इत्यादी उपस्थित होते.
दर्शन घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे(eknath sinde) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महाड पोलादपूरला महापूर, दरडीचा धोखा लक्षात घेता यावेळी आमदार गोगावले यांनी मुख्यमंत्री महोदयांना महाड येथे एनडीआरएफ टीम कायमस्वरूपी ठेवण्यासंदर्भात विनंती करून निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी त्वरित गोगावले यांच्या मागणीला मान्यता दिली. पुरामुळे महाड शहरात प्रत्येक वर्षी सावित्री नदीचे पाणी शिरत असल्यामुळे नदीत वाढलेली जुट्टे काढण्यात यावेत यासाठीदेखील लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी गोगावले यांच्याकडून महाडच्या दुर्घटनेची माहिती घेऊन आपण दुर्घटनाग्रस्तांना आणि त्यांच्या परिवारांना उघड्यावर ठेवणार नसल्याचे सांगून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.