मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सक्ती न करता प्रवेश द्या

कल्याण : विद्यार्थी भारतीने अनुसूचित जाती जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात महाविद्यालयातील प्रवेशामध्ये जात प्रमाणपत्र, जात पडताळणी पत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियरची सक्ती न करण्याची मागणी ईमेलच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविता यावा म्हणून मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, समाजकल्याण आयुक्त यांनी कागदपत्रांची सक्ती सद्यस्थितीत रद्द करण्यासाठी परिपत्रक काढावे, अशी मागणी विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी केली आहे. मागील पाच महिने देश कोरोनाच्या महाभयंकर संकटात आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करण्याकडे राज्याची पाऊले पडत असताना अनेक महाविद्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालये विहित जात प्रमाणपत्र, जात पडताळणी पत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर ही कागदपत्रे नसल्याने प्रवेश नाकारत आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर फेकले जात आहेत. या संकटात असताना कागदपत्रे बनविणे शक्य नाही. अशात महाविद्यालये कागद पत्रांविना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचे आढळतात. अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क करावा, असे आवाहन संघटनेच्या राज्य कार्यवाह आरती गुप्ता यांनी केले आहे.