पोलीस आयुक्तालय वसईमध्येच असावे – खासदार गावित यांची मागणी

वसई : मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालय वसईमध्ये असावे, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाबाबत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे गावित यांनी सांगतिले. या दोन महापालिका क्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त कार्यालय सुरु करण्याची घोषणा १३ सप्टेंबर २०१९ ला राज्य सरकारने केली होती.
वसई विरारमधील गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्यालय वसई येथे असावे व वसईमध्ये पोलीस आयुक्तलयाचे मुख्यालय होईलच, अशी खात्री गावित यांनी व्यक्त केली. वसई विरारमध्ये मुख्यालयासाठी सध्या जागा नसली तर तात्पुरत्या स्वरुपात अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाचे स्थलांतर करता येईल त्या जागी पोलीस आयुक्तांचे कार्यालय सुरु करता येईल, असे गावित यांनी म्हटले.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी मीरा भाईंदरमधील पोलीस आयुक्त कार्यालयाला पसंती दिली आहे. याबाबत विचारले असता गावित यांनी गुन्ह्यांचे प्रमाण पाहता वसईमध्ये मुख्यालय सुरु होण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत प्रयत्न सुरु राहतील, असेही ते म्हणाले. राज्य शासनाने वसई विरार आणि मीरा भाईंदरची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता याठिकाणी नवे आयुक्तालय निर्माण व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून खासदार,आमदारांनी प्रयत्न सुरु होते व लवकरच त्यांना यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.