अजित पवार, जयंत पाटील, तटकरे, मुंडे यांच्यासह ११ जणांना पोलिसांची नोटीस

मुंबई : मुंबई पोलिसांची बाजू घेवून भांडणाऱ्या महाविकास राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अजित पवार(ajit pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील(jayant patil), खासदार सुनील तटकरे(sunil tatkare), कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे(dhananjay munde), शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर(sachin ahir) यांच्यासह ११जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस(notice) बजावली आहे.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी २०१८ मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ०२ ऑक्टोबर २०१८ रोजी कलम ३७(१) सह १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह अशोक धात्रक, निलेश भोसले, अमित हिंदळेकर, अनिल कदम, किरण गावडे आणि सोहेल सुफेदार या सर्वाना ३१ आगस्ट रोजी सकाळी ११ वा. न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन भाजपा – सेना युती सरकार विरोधात आंदोलन केले होते. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, सध्यामुंबई पोलिसांची बाजू घेवून केंद्राच्या सिबीआयशी पंगा घेणा-या सरकारच्या वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन सरकार विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.