दुधावरून राजकारण तापले, भाजप मैदानात

दुधाच्या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच भाजपने आंदोलन केले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक घेऊन याविषयावर चर्चाही केली होती, पण या बैठकीत योग्य तोडगा निघाला नाही.

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळत नाही मात्र ग्राहकांकडून पूर्ण किंमत आकारली जात आहे. या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने राज्यभर आंदोलन करत शेतकऱ्यांना प्रति लीटर १० रुपये आणि दूध पावडरसाठी ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

दुधाच्या समस्येवरून भाजपने काही दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली होती, पण या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. या मुद्द्यावर कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप हा मुद्दा ‘जैसे थे’च आहे.

मित्रपक्षांसह भाजपचे प्रदर्शन

शनिवारी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष रयत क्रांती, रासप, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले. या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला. आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

मुंबईत आंदोलनाचे मुख्य केंद्र महानंद डेरी होते. या ठिकाणी भाजप नेत्यांनी आंदोलन केले. याचे नेतृत्त्व मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले. या आंदोलनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी राज्य मंत्री विद्या ठाकूर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : फडणवीस

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने एकदा आंदोलन केले आहे. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांची बैठक घेतली. दुग्ध विकास मंत्र्यांनी सांगितले, कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा करून घोषणा करू, पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आज भाजपने राज्यभर आंदोलन केले, तरीही सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर भाजपला आणखी तीव्र आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.