राज्य सरकारच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचे आंदोलन मागे

येत्या ८ दिवसांमध्ये नियमावली तयार करून मंदिरे खुली करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(prakash ambedkar) यांनी पंढरपूरमधील आंदोलन मागे घेतले आहे. वंचित बहुजन आघाडी(wanchit bahujan aghadi) आणि विश्व वारकरी सेवा यांनी मिळून आज  हजारो लोकांच्या उपस्थितीत मंदिरं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा पंढरपुरमध्ये येऊन आंदोलन करू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी आज १५ जणांसोबत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले. मंदिर, मशीद आणि बुद्धविहारे सुरु केली जाणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यासाठी ८  दिवसांमध्ये सरकार नियमावली तयार  करणार आहे. मात्र जर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचितच्या आंदोलनाला यश आले आहे, असे ते यावेळी म्हणाले. तसेच लोकभावनेचा आदर करून मागणी मान्य केल्याबद्दल आंबेडकरांनी सरकारचे आभारही मानले.

याअगोदर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी नियम मोडण्यासाठी आल्याचे सांगत हजारोंच्या गर्दीचे समर्थन केले. ते असे म्हणाले की, या लोकांच्या भावना आहेत. लोकच सरकारला दाखवून देतायत, हे बघून  सरकारने भूमिका बदलावी.