प्रशांत साळुंके ठरले पूरपरिस्थितीमधील ‘देवदूत’, पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

रोहन शिंदे, महाड : अतिवृष्टी आणि महापूर महाडला नवा नाही. नेमेची येतो मग पावसाळा अशा पद्धतीने महाडमध्ये पावसाबरोबरच महापुराचेही संकट कोसळत असते. या काळात प्रशासनासमोर आव्हान असते ते पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे. यावर्षी  प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून या कामात मोलाचे सहकार्य केले ते महाड येथील उद्योजक प्रशांत साळुंके यांनी. प्रशांत साळुंके यांनी यावर्षीच्या महापुरात महाड, पोलादपूर आणि गोरेगाव परिसरात बचावकार्य करून शेकडो जणांचे प्राण वाचविले. पुरात अडकून पडलेल्यांसाठी तर ते देवदूत ठरलेच पण दुर्दैवाने या महापुरात वाहून जात मरण पावलेल्यांचे मृतदेह शोधण्याचे कामदेखील प्रशांत साळुंके यांनी केले.

प्रशांत साळुंके यांनी स्वतःच्या असंख्य बोटी सहित ‘प्रशांत साळुंके रेस्क्यु टीम शिरगाव’ हे स्वतःचे बचाव पथक कार्यरत केले आहे. या बचाव पथकाची उपयुक्तता यावर्षीच्या महापुराच्या वेळेस सिद्ध झाली. या पथकाने ४ ऑगस्ट रोजी गोरेगाव नजिकच्या चिंचवली येथील मुख्तार वेळासकर यांच्या फार्म हाऊसमध्ये अडकलेल्या पंचवीस जणांची सुटका केली. हे फार्म हाऊस चारही बाजुंनी पुराच्या पाण्याने वेढलेले होते. आत अडकलेल्यांची सुटका करणे हे एक आव्हानात्मक काम होते. प्रशांत साळुंके यांच्या बचाव पथकाने अत्यंत कौशल्याने या सर्वांची सुटका केली. त्याच दिवशी कोलाड येथील निळजे धरणात बुडालेल्या एका व्यक्तिच्या शोधकार्यातदेखील प्रशांत साळुंके यांच्या पथकाने सहभाग घेतला. त्यानंतर रात्रभर ही टीम मुंबई -गोवा महामार्गावर तैनात होती.

गोरेगाव येथील सोन्याची वाडी येथे ५ ऑगस्ट रोजी अडकलेल्या ८६ नागरिकांना या टीमने पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. ६ ऑगस्ट रोजी म्हसळा येथील खाडीमध्ये पोहोण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम या टीमने केले. त्याच दिवशी सायंकाळी पोलादपूर नजिक सावित्री नदीपात्रात अडकून  पडलेल्या तिघांना या टीमने सुखरुप बाहेर काढले. या सर्व काळात प्रशांत साळुंके यांच्या दोन टीम महाड शहरातील पूर परिस्थितीत बचाव कार्यासाठी सज्ज होत्या. या काळात सुमारे शंभरपेक्षा अधिक लोकांना पुराच्या पाण्यात सुखरुप बाहेर काढण्याचे काम साळुंके यांच्या टीमने केले. हे काम करणाऱ्या टीममध्ये प्रशांत साळुंके यांच्यासह प्रजित साळुंके,  प्रणित साळुंके, मनोज रेशिम, विशांत साळुंखे, अनिकेत पाटील यांचा समावेश आहे. या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.  रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशांत साळुंके यांच्या या कामाची दखल घेत स्वातंत्र्य दिनी त्यांना राज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.