pravin darekar

विरोधकांचा आजचा बंद हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर(pravin darekar) यांनी केला आहे.

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(pravin darekar) यांनी शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे, असा निशाणा साधला आहे. आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. फक्त स्वार्थासाठी हे सर्व सुरु असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. असा कायदा करावा म्हणून याच पक्षांनी पत्र लिहीली होती, कायद्याला समर्थन दिले होते मात्र आता विरोध करत असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

विरोधकांचा आजचा बंद हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. शिवसेना इतिहास विसरत चालली आहे. बाळासाहेबांनी काय केले हे देखील ते विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, हे कुणालाही दाखवण्याची गरज नाही.

प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘शरद पवार यांच्या भूमिका या काळानुरुप बदलत चालल्या आहेत. पवार साहेबांचे बदललेले स्वरुप देशासमोर आले आहे. स्वत: केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा कायदा किती महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंतप्रधान मोदींनी कायदा केला तर त्याला विरोध का?’ असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे.