कल्याणमध्ये सापडला दुर्मिळ दुतोंडी साप

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गंधारे परिसरात दुर्मिळ दुतोंंडी घोणस प्रजातीचा वेगळा साप आढळल्याची घटना आज दुपारी घडली. गेल्या दोन दिवसांपासून कल्याणमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. नाले, नदी, खाडी तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मनुष्यवस्तीमध्ये साप निघत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे .

कल्याण पश्चिमेतील गंधारे परिसरातील रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास डिंपल शहा यांना आढळले. त्यांनी तात्काळ वाॅर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमला संपर्क केला असता सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला. त्यावेळी तो दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस प्रजातीचा साप  असल्याचे निदर्शनास आले.

दुतोंडी साप आढळल्याने नैसर्गिक जीवनाची ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस वाॅर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमने बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यावेळी त्या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन कार्यासाठी ताब्यात दिले होते. मात्र संशोधन सुरू असताना त्या सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांदा दोन तोंडाच्या घोणस सापाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचे वाॅर रेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी या निमित्ताने   माहित दिली. याप्रसंगी विशाल कंथारिया, स्वप्निल कांबळे, हितेश करंजगावकर, उपस्थित होते.

गेल्या वर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते. मात्र आता ते पूर्ण होऊ शकते. तसेच आधी सापडलेला आणि आता सापडलेला दुतोंडी दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. या घटनेची जागतिक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन प्रपत्र ( Reptiles Research Paper) जाहीर करणार असल्याचे वन्यजीव अभ्यासक व वाॅर रेस्क्यू टिमचे सचिव सुहास पवार यांनी सांगितले. तसेच या दुतोंडी सापाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोळे यांनी तपासणी करुन प्रकुती ठीक असल्याचे सांगितले. उपवन सरंक्षक अधिकारी जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.