राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन

नांदेड : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर (वय १०४) यांचे आज नांदेड येथे निधन झाले. मागील चार दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना निमोनिया झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज त्यांचे निधन झाले.

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा जीवनपरिचय
राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याला वाहून घेतले होते. अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता.