शासनाच्या मदतीची वाट न पाहता ‘त्यांनी’ स्वत:च बांधला बंधारा, वाचवली शेती

पेण: पेण तालुक्यातील खारेपाट भागातील जनतेला वर्षाचे १२ महिने कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावेच लागत असते. त्यातील महत्वाची समस्या म्हणजे पाणी. एकिकडे पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी आंदोलने तर दुसरीकडे खाडीतील येणारे खारे पाणी घुसून शेतीचे होणारे नुकसान या दुहेरी संकटात येथील नागरिक अडकलेले आहेत. काही दिवसांपूर्वी या भागातील ६० ते ७० नागरिकांनी अंगमेहनत करून फुटलेला बंधारा बांधला आणि आपले होणारे शेतीचे नुकसान वाचविले आहे.

पेण तालुक्यातील खारेपाट भागातील धरमतर खाडी किनाऱ्यालगत असणाऱ्या नारवेल बनवले स्कीममधील बंधारा काही दिवसांपूर्वी फुटला. बंधारा बांधला नाही तर खाडीतील भरतीचे पाणी शेतामध्ये घुसून हजारो एकर शेती ही पाण्याखाली जाण्याची भीती होती. खारभूमी विकास कार्यालायला कळवूनसुद्धा येथील अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने अखेर या भागातील मळेघरवाडी, मंत्रीवाडी, घोडाबंदर, विठ्ठल नगर, जनवलीबेडी आदी गावांमधील ६० ते ७० नागरिकांनी एकत्र येऊन दिवसभर मेहनत घेऊन ही १० ते १२ मीटर लांबीची खांड स्वतः बांधली आणि आपले शेकडो एकर शेतीचे होणारे नुकसान वाचविले. येथील बाह्यकाठ्यांना अशा प्रकारच्या नेहमीच खांडी जात असल्याने खारभूमी कार्यालयामार्फत बांधण्यात येणारे हे बंधारे काय प्रतीचे असतील हे समजून येते. मात्र येथील नागरिक बंधारे बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी येतील आणि काम करतील याची अपेक्षा न बाळगता आपल्या मेहनतीने एकत्र येऊन अशा प्रकारचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना लाजवेल असे काम करतात, त्यांच्या या कार्याला सलाम.

येथील अधिकाऱ्यांबाबत आणि ठेकेदारांबाबत येथील नागरिक नाराजीचा सूर काढत असून बंधारा बांधण्यासाठी ज्या नागरिकांनी मेहनत घेतली आहे त्यांना केलेल्या मेहनतीचे फळ मिळालेच पाहिजे, अशी अपेक्षा या भागातील काही नागरिक व्यक्त करीत आहेत.