amit deshmukh in mantralay

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनुसंधान केंद्राचा विस्तार देशातील अग्रगण्य वैद्यकीय रुग्णालयाच्या धर्तीवर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढाकार घेणार आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनुसंधान केंद्राचा विस्तार देशातील अग्रगण्य वैद्यकीय रुग्णालयाच्या धर्तीवर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढाकार घेणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये(research centre) ९७१ खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय(hospital) व नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार संस्था सुरु करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने सादर करावा तसेच प्रस्तावित पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (amit deshmukh)यांनी सांगितले.

आज मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार कुणाल पाटील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासच्या अध्यक्षा शीतल उगले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड -१९ बाबतची पार्श्वभूमी पाहता महाराष्ट्राच्या उपराजधानीत सुसज्ज वैद्यकीय रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय विभागाच्या मदतीने प्रयत्न करणार असून याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरु करण्यात येणारे सर्वांत मोठे रुग्णालय ठरणार असून यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग समन्वयाने काम करेल.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यावेळी म्हणाले की, सध्या हे रुग्णालय बाहयरुग्ण विभागापुरते मर्यादीत असून हे रुग्णालय लवकर सुरु झाल्यास पूर्व, उत्तर नागपूरसह ग्रामीण आणि सीमेलगतम असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा सुध्दा उपलब्ध असल्याने रुग्णालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. या रुग्णालयासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचीत उपाययोजनेतून नियतव्यय देण्यात येणार असल्याने या विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास गती द्यावी.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे २००५ पासून बाह्य रुग्ण विभाग कार्यरत असून दररोज ४०० ते ५०० रुग्ण सेवा घेतात. मात्र या ठिकाणी आजमितीस आंतररुग्ण सेवेसाठी इमारत व सोयी नसल्याने आजारी रुग्णांना इंदिरा गांधी वैदयकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे संस्थेच्या उर्वरित जागेत रुग्णालयाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याला गती देण्यात येणे आवश्यक असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्यूरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहे तर प्रस्तावित पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्त रोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमर्जन्सी मेडिसिन इत्यादी सतरा अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहे.