नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाडमध्ये पूर

महाड शहरामध्ये एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाडमधील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून गांधारी नाका, बाजारपेठ, सुकट गल्ली, काजळपुरा रस्ता, दस्तुरी नाका येथे पुराचे पाणी घुसले आहे तर सावित्री नदीवरील दादली पूल आणि गांधारी नदीवरील पूल दक्षता म्हणून काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

महाड:  गेल्या दोन दिवसांत संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. तालुक्यांतून वाहणाऱ्या सावित्री, गांधारी, काळ आणि नागेश्वरी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी शिरल आहे तर तालुक्यात सर्वदूर परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण जनजीवन  विस्कळीत झाले आहे.

महाड शहरामध्ये एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाडमधील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून गांधारी नाका, बाजारपेठ, सुकट गल्ली, काजळपुरा रस्ता, दस्तुरी नाका येथे पुराचे पाणी घुसले आहे तर सावित्री नदीवरील दादली पूल आणि गांधारी नदीवरील पूल दक्षता म्हणून काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान पावसाचा जोर वाढतच असून संभाव्य पूरपरिस्थिती सर्व तऱ्हेची नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व तऱ्हेची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून ग्रामस्थ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एखदा महाड तालुका दरडी, अतिवृष्टी, महापुराच्या रडारवर लटकत राहणार आहे.

 गेले दहा बारा दिवस पावसानी दिर्घ दडी मारली होती तर मागील वर्षीच्या तुलनेत तो १२०० मि. मी . एवढा कमी नोंदला गेला होता. यामुळे दिर्घ विश्रांती घेणारा पाऊस जोरदार मुसंडी मारणार हे गृहीत धरण्यात आले होते. सध्या भारतीय हवामान खाते भलतेच फॉर्मात आहे. यावर्षीचा पाऊस ९८ % तर तो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बरसणार असल्याचे या खात्याने म्हटले होते ते आज खरे ठरत आहे.

सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर अचानक वाढला. मंगळवारी पहाटे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी, नागरिक यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. तालुक्यातील रायगड रोड पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपुणे बंद होती. तालुक्यातील बिरवाडी एम.आय.डी.सी. पाण्याखाली होती. रावढळ, दासगाव, विन्हेरे, वाळण, वरंध आधी भागातील पूल साकव पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले होते. अनेक गांवाचा संपर्क तुटला आहे.

सावित्री नदीने धाेक्याची पाणी पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला असून नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर पडू नये, तसेच वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पाेल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे.स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.