nitish kumar

नितीशकुमार(nitishkumar) यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या(cabinet expansion) विधानानंतर बिहारचे राजकारण तप्त होत असल्याचे दिसत आहे. राजद व काँग्रेसने राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या असलेल्या महत्त्वावर टोमणा हाणला आहे.

पाटणा: बिहारमधील(bihar) एनडीए सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या(cabinet expansion) मुद्द्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमार(nitishkumar) यांनी मोठे विधान केले. भाजपाचा(BJP) प्रस्तावच न आल्यामुळे विस्तारास विलंब होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले होते. भाजपाचा प्रस्ताव आल्यानंतरच यावर निर्णय होईल, असेही ते म्हणाले होते. नितीशकुमार यांच्या या विधानानंतर बिहारचे राजकारण तप्त होत असल्याचे दिसत आहे. राजद व काँग्रेसने राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या असलेल्या महत्त्वावर टोमणा हाणला आहे. राजदने तर नितीश यांनी आता तेजस्वी यादव यांचा राज्याभिषेक करावा आणि राष्ट्रीय राजकारणात जावे असा सल्ला दिला आहे.

हा तर भाजपाचा डाव : राजद
नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताच राजद नेते विजय प्रकाश यांनी भाजपा नितीशकुमार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जदयूला ४३ जागांवरून १३ पर्यंत खाली खेचण्याचाच भाजपाचा मुख्य उद्देश आहे,असा दावा केला. आताही वेळ गेलेली नसून नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांचा बिहारमध्ये राज्याभिषेक करावा आणि स्वत: देशाच्या राजकारणात निघून जावे, असा सल्ला दिला.

मुख्यमंत्री हतबल : काँग्रेस
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नितीशकुमार यांनी विधान करताच काँग्रेसनेही टोमणा हाणण्यात कोणतीच कसूर केली नाही. मुख्यमंत्री आता हतबल ठरले आहेत,असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते राजेश राठोड यांनी हाणला. मंत्रिमंडळ विस्तार त्यांचा विशेषाधिकार आहे. मात्र यासाठी ते मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या आदेशची वाट पाहत आहेत असे राठोड म्हणाले. आता कुठे त्यांचा आत्मा जागृत होत आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर राजीनामा देणेच योग्य ठरेल, असेही ते म्हणाले.

भाजपाचे स्पष्टीकरण
दरम्यान, निश्चित वेळेतच निर्णय घेण्यात येईल,असे स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचा बचाव करताना अंतिम निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमारच घेतील असेही त्यांनी म्हटले. एनडीएमध्ये कोणताही वाद नसून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय योग्य वेळीच जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.

मांझींनी केले तेजस्वींचे कौतुक
हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तेजस्वी यादव मुलाप्रमाणे असून ls बिहारचे युवा नेते आहे, असे ते म्हणाले. कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांना उत्तम आरोग्याची शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या पत्रावर मांझी यांनी ट्विट केले आहे. माझी यांच्या या ट्विटनंतर मात्र राज्यात विविध चर्चांनाही ऊत आला आहे. मांझी बिहारमधील एनडीए सरकार आणि केंद्रातील राजकारणात आपले वर्चस्व वाढविण्यासाठीच अशी विधाने करीत आहे अशी चर्चा सुरू झाली.

उल्लेखनीय असे की काही दिवसांपूर्वीच मांझी यांनी शेतकरी आंदोलनावर ही भाष्य केले होते. यापूर्वी बिहार निवडणुकीत महाआघाडीत असलेल्या मांझी यांनी नितीशकुमार यांचे कौतुक करून नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले होते. त्यानंतर ते एनडीएत सहभागीही झाले होते. मांझी यांनी आतापर्यंत तीन वेळा पक्षांतर केले आहे.