रस्त्याचा संरक्षक कठडा कोसळला, महाड-भोर-पुणे मार्ग वाहतुकीसाठी बंद

महाड: गेले चार पाच दिवस संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गुरुवारी संध्याकाळी महाड – भोर मार्गावरील माझेरी घाटामध्ये रस्त्याचा संपूर्ण संरक्षक कठड्याचा ओसरा खालच्या रस्त्यावर कोसळण्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा हा मार्ग बंद पडला असून अनेक वाहने घाटामध्ये अडकून पडली आहेत.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी या अवघड घाटांच्या रस्त्याच्या कडेने रिलायन्स कंपनीची केबल लाईन पुणे जिल्हयाकरिता टाकण्यात आली होती. तेव्हापासून हा अवघड घाट आणखी धोकादायक बनला आहे. गुरुवारी संपूर्ण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून वाघजाई मंदिर येथून माझेरी घाटातील पहिल्या वळणावरील रस्त्याच्या कडेचा संपूर्ण पारपीट (संरक्षक ) कठडयाचा ओसरा खालच्या रस्त्यावर कोसळला आहे .

मागील वर्षी पावसाळ्यात माझेरी घाटातील अशाच घटनेमुळे त्या कामाकरिता संपूर्ण घाट मार्ग चार ते पाच महिने वहातुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्याकामावेळी रिलायन्स जिओ कंपनीच्या केबलवर काँक्रीटीकरणही करण्यात आल होते. तरीही आज याच केबलमुळे पुन्हा घाटातील रस्त्याचा पारपीट भाग कोसळल्याने पुन्हा संपूर्ण माझेरी घाटच आता ऐन पावसाच्या तोंडावर धोकादायक बनला आहे . या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करत वरच्या भागातून खालच्या रस्त्यावर कोसळलेला मातीचा ओसरा हटविण्याकरिता काही डंपर जेसीबी घेवून घटनास्थळी पोहचले आहेत .

हा घाट मार्ग महाड सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार बनलेले गावपुढारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरणच ठरलेला आहे. राज्य शासनाने कालच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. असे गुन्हे दाखल करण्याचा शुभारंभ निकृष्ट कामे करून वरंधा घाटच गिळून टाकणाऱ्या ठेकेदार आणि महाड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपासून करावा अशी संतप्त मागणी होवू लागली आहे. दरम्यान संपूर्ण तालुक्यात पावसाचा प्रंचड जोर वाढत असून २५ व २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या महापुरापेक्षा संपूर्ण तालुक्यावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.