महाड औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांची झाली चाळण

महाड : सध्या महाड औद्योगिक वसाहत कात टाकत आहे. मात्र या वसाहतीच्या मुख्य रस्त्याची झालेली चाळण पाहता वाहन चालकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. इथल्या खराब रस्त्यामुळे या औद्योगिक वसाहतीमध्ये रात्रपाळीसाठी जाणाऱ्या कामगारांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने कामगार प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीची स्थापना सुमारे चाळीस वर्षापूर्वी झाली आहे. त्यांनतर पुन्हा विस्तारित औद्योगिक वसाहतही सुरु करण्यात आली. काही वर्षांपूर्वी या औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने या ना त्या कारणांनी बंद पडले होते. आता पुन्हा ही औद्योगिक वसाहत कात टाकत असून नवनवीन कारखाने येथे येत आहेत. मात्र सध्या या औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशापासूनच्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. मुळात मागील वर्षाच्या पावसाळ्यात झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेची साधी मलमपट्टी करण्यात आली होती. तेच पडलेले खड्डे व्यवस्थित आणि चांगल्या दर्जानी भरले असते तर आज खड्डयांमुळे रस्त्याची एवढी चाळण झाली नसती.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ नक्की कसला विकास साधतात असा प्रश्न हे खड्डे पाहून पडतो. वास्तविक या वसाहतीतून या विकास मंडळाला प्रतिवर्षी करोडो रुपये अनेक विषयांतून करांद्वारे प्राप्त होत आहेत. रस्त्यावर आणि डागडुजीवर नेहमी खर्च केला जातो. मात्र ठेकदाराकरवी ते काम निष्कृट दर्जाचे  केले जाते. त्याची चौकशी व्हावी अशी या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांची मागणी आहे.