रॉबिनहुड आर्मी भारत, परदेशात १५ ऑगस्टपर्यंत ३ कोटी वंचितांना जेवण पुरवणार

रेस्तराँ आणि समुदायांकडील अतिरिक्त अन्न कार्यकर्त्यांच्या मदतीने वंचितांना उपलब्ध करून देण्यासाठी रॉबिनहुड आर्मी कार्यरत आहे. ही शून्य निधी संघटना आपल्या #मिशन३०एम या उपक्रमांतर्गत भारतातील शहरी तसेच ग्रामीण भागात आणि अन्य १० देशांमध्ये जेवण पुरवणार आहे. ५० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२० पर्यंत ३ कोटी जेवण उपलब्ध करून देण्याची कटिबद्धता रॉबिनहुड आर्मीने व्यक्त केली आहे.

मुंबई : रेस्तराँ आणि समुदायांकडील अतिरिक्त अन्न कार्यकर्त्यांच्या मदतीने वंचितांना उपलब्ध करून देण्यासाठी रॉबिनहुड आर्मी कार्यरत आहे. ही शून्य निधी संघटना आपल्या #मिशन३०एम या उपक्रमांतर्गत भारतातील शहरी तसेच ग्रामीण भागात आणि अन्य १० देशांमध्ये (बहारिन, बोट्सवाना, मलेशिया, नेपाळ, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका, युगांडा) जेवण पुरवणार आहे. ५० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२० पर्यंत ३ कोटी जेवण उपलब्ध करून देण्याची कटिबद्धता रॉबिनहुड आर्मीने व्यक्त केली आहे.

#मिशन३०एम हा देशोदेशीचे उद्योजक आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून मागास ग्रामीण भाग, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, निराधार लोक, आजारी रुग्ण आणि रोजंदारीवरील मजूर यांना आवश्यक अन्न उपलब्ध करून देणारा सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे. कोविड-१९ मुळे लक्षावधी लोकांनी रोजगाराचे साधन गमावल्यामुळे अलिकडच्या काळातील सर्वात मोठे उपासमारीचे संकट घोंघावत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिशन३०एम हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १ जुलै २०२० पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत गेल्या ३३ दिवसांमध्ये ९ देशांतील १४३ शहरांमध्ये १.२५ कोटी जेवणांचा पुरवठा करण्यात आला आहे. सौहार्दाचे प्रतीक असलेला हा आगळावेगळा उपक्रम हार्वर्ड केस स्टडी देखील आहे.

#मिशन३०एम या उपक्रमाने सध्या #मिशनफिनाले या पर्वात, म्हणजे आपल्या अंतिम १० दिवसांत प्रवेश केला असून त्याचा समारोप स्वातंत्र्यदिनी होणार आहे. ३ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अंतिम टप्प्यातील या मोहिमेला गती देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आणि स्त्रोतांना एकत्र आणण्यासाठी मिशन प्रयत्नशील आहे. उपक्रमाच्या चमूने उपक्रमाच्या सर्व भौगोलिक प्रदेशांचा एकत्रित रिअल-टाइम डॅशबोर्डही तयार केला आहे. भारतात या उपक्रमाला गोदरेज समूह, के कॉर्प चॅरिटेबल फाउंडेशन, अक्षयपात्र, बुकअस्माइल आदींनी पाठबळ दिले आहे.

रॉबिनहुड आर्मीचे संस्थापक नील घोष म्हणाले, “कोविड-१९चे परिणाम त्या आजाराइतकेच घातक आहेत. लक्षावधी लोकांनी त्यांचे उपजीविकेचे साधन गमावले आहे. परिणामी उपासमारीचे संकट अधिक गहिरे झाले आहे. सर्व जबाबदारी प्रशासनावर टाकणे सोपे आहे, परंतु सध्याच्या संकटाची जबाबदारी केवळ सरकारवर न टाकता समाजानेही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. #मिशन३०एम या उपक्रमाद्वारे ३ कोटी लोकांपर्यंत जेवण पुरवणे हे अशा प्रकारे नागरिक आणि उद्योजकांना एकत्र आणून पीडित व्यक्तींची जबाबदारी घेण्याच्या आगामी अनेक उपक्रमांची सुरुवात ठरेल, अशी आशा आहे.”

आरुषी बात्रा आणि संचित जैन हे रॉबिनहुड आर्मीचे अन्य सहसंस्थापक आहेत. अधिकाधिक लोकांनी जेवणासाठी योगदान द्यावे अथवा रॉबिनहुड आर्मीत सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहित करताना २०१६ पासून रॉबिन असलेल्या मुंबईतील फैझा ए धनानी म्हणाल्या, “मुंबईत आजघडीला कच्च्या धान्याच्या १ लाख संचांची आवश्यकता आहे. पालघर, पेण, पाली, मुरबाड, रायगड, विक्रमगड, विरार, बोईसर आणि अन्य अंतर्गत भागातील आदिवासी बांधवांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांना कुठलीही संस्था अथवा संघटनेची मदत अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे मालवणी, धारावी, भिवंडी, मानखुर्द, वसई आदी भागांतील रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्यासह अल्प उत्पन्न गटातील तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांनाही मोठा फटका बसला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्थानिक पंचायती, पोलिस अधिकारी आदी स्थानिक प्रशासनाकडूनही आम्हाला जेवणाचे वितरण करण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे.”

रॉबिनहुड आर्मीच्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या/तिच्या मोकळ्या वेळेत हे काम करणार असून यामध्ये कुठल्याही आर्थिक देणगीचा समावेश नाही. आशा आणि अन्न हे दोन मूलभूत अधिकार असतील अशा प्रकारच्या जगाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली आरएचए robinhoodarmy.com/mission30M येथे नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी समाजाला आवाहन केले आहे.