रोहा केळघर मार्गे मुरुड रस्ता खचला, दोन ठिकाणी कोसळली दरड

रोहा: रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून गेले चार दिवस दाणादाण उडाली आहे. नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. पूर परिस्थिती निर्माण झाली असतानाच रोहा केळघर मार्गे मुरुड रस्त्यावर कवाळटे गावाच्या आसपास  रस्ता अती पावसाने खचला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. याच मार्गावर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. रस्त्यावर मातीचे ढीग पसरले असून मोठी झाडे पडली आहेत. 

मुरुड आणि रोहा या दोन्ही तालुक्यांचा केळघर मार्गे दळणवळणाचा मार्ग बंद झाला आहे.वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने दोन ठिकाणी दरड कोसळली असून एका वळणावर रस्ता खचला आहे. गेल्या वर्षी  याच मार्गावर कवाळटे आदिवासी वाडी येथे धस कोसळून रस्ता खचला होता रस्त्याला भेगा पडल्या होत्या. या पावसात पुन्हा दोन ठिकाणी दरड कोसळल्याने तसेच रस्ता खचल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने येथील भूगर्भाचा अभ्यास करण्याची मागणी नागरिक करत आहेत.