भिवंडीत ग्रामीण मुलींची इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भरारी

भिवंडी: दहावी शालांत परीक्षा मार्च- २०२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोनगांव व टेंभवली येथील दोन मराठी मुलींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भरघोस गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या चमकदार कामगिरीमुळे या दोन्हीं मुलींचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

संघमित्रा जाधव ही कोनगाव येथे राहत असून ती कल्याण येथील होलिमेरी कॉन्व्हेंट स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. तिने ९२% गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला असून कोनगावात इतिहास घडवला आहे.तिने शालांत परिक्षेत सुयश प्राप्त केल्याने सरपंच डॉ. रुपाली कराळे,समाजसेवक डॉ.अमोल कराळे, ग्रा.स.अशोक म्हात्रे, कुमार म्हात्रे, दर्शन म्हात्रे , पांडुरंग कराळे आदींनी घरी जावून अभिनंदन केले आहे. तर टेंभवली येथील रिद्धी नांदुरकर ही विद्यार्थिनी भिवंडी शहरातील एनईएस स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे.तिने शालांत परीक्षेत ९३.६०% गुण मिळवून शाळेत चौथा क्रमांक पटकावला आहे. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकताना कठीण वाटत असताना या मराठी मुलीने भरघोस गुण प्राप्त करून आपले बुद्धी कौशल्य सिद्ध केले आहे. तिच्या या चमकदार कामगिरीचे आमदार शांताराम मोरे ,शिवसेना शाखा प्रमुख नरेंद्र गोराडकर ,माजी उपसरपंच अविनाश नांदूरकर,प्रेमनाथ मढवी, शेखर भोईर ,राजेंद्र पाटील, चंद्रकांत कडव आदींनी प्रत्यक्ष तिच्या घरी भेट घेऊन पुष्पगुच्छ, मिठाई व रोख पाच हजार रुपये देऊन तिचे अभिनंदन करून यथोचित गौरव केला आहे.