भक्ती पाटीलचे निलंबन अन्यायकारक -खोपडे

पेण: कोरोनामुळे उघडकीस आलेल्या एसटी पास घोटाळ्यातील भक्ती पाटील(bhakti patil) या वाहक महिलेला निलंबित करण्यात आले आहे. भक्ती पाटील या पेण आगारातील महिला वाहकाला त्रैमासिक पास(three months pass) देताना झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी केलेले निलंबन हे अन्यायकारक आहे. कारण तिने पास तिच्या ड्युटीमध्ये दिलेला नसून त्या पासावरील अक्षर व सही भक्ती पाटील यांची नाही. तिच्या सहीसारखी कुणीतरी सही केली आहे, अशी माहिती भक्ती पाटील यांनी रायगड विभागाचे युनियनचे अध्यक्ष विलास खोपडे यांना सांगितली आहे. त्यानंतर खोपडे यांनी हे निलंबन अन्यायकारक असून भक्ती पाटीलच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे.

भक्ती पाटील या महिलेला नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये काही दिवसांकरता पास देण्याच्या कामासाठी बसवण्यात आले होते. हे काम वाहकाचे नसूनसुद्धा प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून तिने हे काम स्वीकारले. भक्ती पाटील हिने स्वतःच्या हस्ताक्षरात व स्वतःच्या सहीने दिलेल्या पासच्या बाबतीत गैरव्यवहार झालेला नाही. फेब्रुवारी २०२० मध्ये दिलेल्या पावसाचा गैरव्यवहार झालेला आहे. माहे फेब्रुवारी २०२० मध्ये भक्ती पाटीलनी त्रैमासिक पास देण्याचे काम केलेले नाही. भक्ती पाटील यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये काही दिवस त्रैमासिक पास देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात भक्ती पाटील या महिला वाहकाचा काही एक दोष राहत नाही. तिच्याकडून कोणताही अपहार झालेला नाही. त्यामुळेच भक्ती पाटील या निर्दोष आहेत. याप्रकरणी तिच्यावर झालेली निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. याप्रकरणी एसटी कामगार संघटना, रायगड विभाग तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला साथ देईल, अशी माहिती रायगड विभागातील कामगार संघटनेचे प्रमुख विलास खोपडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.