कल्याण डोंबिवलीतील शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांचे निधन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांचे मुंबई येथील खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. गेला महिनाभर सुरु असलेली त्यांची मृत्युशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विवाहीत मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

घाडीगावकर यांना ८ जुलै रोजी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात तर १३ जुलैपासून मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महानगरप्रमुख विजय साळवी, माजी महापौर राजेंद्र देवळेकर आदींनी त्यांची आस्थेने चौकशी करत त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आमचे लाडके घाडीगावकर गेले.एक मेहनती शिवसैनिक गेला.अशी भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.