श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने अद्याप पर्यंत राज्यातील मंदिरं उघडण्यास परवानगी दिली नाही. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी सरकारकडे होत आहे.अशातच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनानं घेतला असून याबाबतचे एक पत्रक मंदिर व्यवस्थापनानं काढलं आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात आज (मंगळवार) एक बैठक घेतली.या बैठकीत मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी काढलेल्या या पत्रकात म्हटले आहे.