श्रीवर्धनमध्ये लवकरच मासेमारी सुरु होण्याचे संकेत

श्रीवर्धन: मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मासळीची मागणी घटल्याने अनेक मच्छीमार बांधवांनी आपला मासेमारीचा व्यवसाय बंद ठेवला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता झाल्यानंतर मासेमारीला प्रारंभ करण्यात आला होता. मात्र पर्यटक श्रीवर्धन तालुक्यात येत नसल्याने देखील मासळीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळत होते. हवामान खात्याने ३ जून रोजी श्रीवर्धन, हरिहरेश्वर समुद्रकिनारा व संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकेल असा अंदाज वर्तविला होता. मात्र २जूनच्या सायंकाळपर्यंत देखील समुद्र शांत असल्याने अनेक बोटी श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरती मच्छिमारी करताना दिसून आल्या होत्या. परंतु चक्रीवादळ झाल्यानंतर मासेमारी संपूर्णपणे बंद करण्यात आली. कारण समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला होता.

दरम्यान,१ जून ते ३० जुलै या काळात मच्छीमारीसाठी बंदी असल्याने मच्छिमारांनी आपल्या होड्या पाण्यातून वर घेऊन शाकारून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होईल, अशी आशा मच्छीमार बांधवांना होती. मात्र नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच समुद्र मोठ्या प्रमाणात खवळला व जोरदार वादळी वार्‍यांसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अद्याप मासेमारी पूर्णतः बंद आहे. मात्र आजपासून वाऱ्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे व समुद्र देखील काही प्रमाणात शांत झाला आहे. काही लहान होड्या तुरळक प्रमाणात श्रीवर्धन समुद्रकिनारी मासेमारी करताना दिसून येत होत्या. येत्या चार ते पाच दिवसात समुद्र पूर्णपणे शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा मासेमारीला चांगल्याप्रकारे सुरुवात होईल. असा अंदाज मच्छीमार बांधवांमधून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच १ सप्टेंबरनंतर राज्यातील सर्व हॉटेल्सदेखील सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याने श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा एकदा पर्यटक नेहमीप्रमाणे यायला सुरुवात करतील व हॉटेल्सदेखील सुरू झाल्यामुळे मच्छीला चांगल्याप्रकारे मागणी वाढेल,असा अंदाजदेखील मच्छीमार बांधवांमधून व्यक्त करण्यात येत आहे.