न्यायालयाच्या निकालानंतर सोमय्या म्हणाले, आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली

मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच मुंबई पोलिसांनी सगळे पुरावे सीबीआयकडे सोपवावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी एका याचिकेद्वारे रिया चक्रवर्तीने केली होती. त्या याचिकेचा निकाल आज न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारची दादागिरी संपली आहे, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

 

सोमय्या यांनी पुढे म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगेच राजीनामा द्यायला पाहिजे. मुंबई पोलीस आयुक्तांनी २ महिने एफआयआर दाखल करुन घेतला नाही, हे दुर्दैवी आहे. यातून ठाकरे सरकार बोध घेईल, अशी आशा आहे. सुशांतच्या कुटुंबियांना आता न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, पाटण्यामध्ये दाखल एफआयआर सर्वसमावेशक आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील इतर कोणत्याही खटल्याचा तपास सीबीआयने करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला मदत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासंबंधी विचारले असता न्यायालयाने नकार दिला आहे.