सोनिया गांधी पद सोडणार? काँग्रेस नेत्यांना नवीन अध्यक्ष शोधायला सांगितले

काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहित पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात मागणी केली होती. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं आहे. मी पक्षाध्यक्ष पद सोडायला तयार असून, तुम्ही सर्वानी एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा असे त्यांनी नेत्यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. विशेष म्हणजे उद्या (२४ ऑगस्ट) काँग्रेसची कार्यकारी समिती महत्वाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी सोनिया गांधींनी केलेले हे सूचक वक्त्यव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

काँग्रेसचे नेत्यांची मागणी काय ?

१५ दिवसांपूर्वीकाँग्रेसच्या दिग्गज २३ नेत्यांनी ज्यात ५ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे अशांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीत पक्षाला नवी उभारी देण्यासाठी हालचाली कराव्यात, याबाबतची मागणी केली होती. पत्रात या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली होती.

सोनिया गांधींचे उत्तर
या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, “पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करावी, काँग्रेस कार्यकारी समितीनं १० ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं आपण समितीला सांगितलं होतं, असे सांगितले आहे.