chandrakant-dada-patil

मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये बदली घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली मलाईदार ठिकाणी मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून खूप पैसा गोळा केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने बदल्या थांबवल्या होत्या. मात्र नंतर १५ टक्के बदल्यांना परवानगी देण्यात आली. या बदल्यांचा बाजार मांडून मंत्र्यांनी पैसे गोळा केले. खूप मोठ्या रकमेची उलाढाल झाली,असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. या सगळ्या प्रकरणात ज्यांचे राजकीय संबंध नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे या प्रकाराची सीआयडी चौकशी होणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटील पुढे असे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत असा आदेश दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरची स्थगिती उठवली, याचे आश्चर्य वाटते. कोरोनाविषयीच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये  बदल्या न करण्याचे धोरण सरकारने मे महिन्यात ठरवले होते. जुलै महिन्यात राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाल्यावर एकूण पदांच्या १५ टक्के बदल्या करण्याचे तसे काही कारण नव्हते, असे पाटील म्हणाले. तसेच त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या धोरणातील गोंधळामुळे कोरोना काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थलांतर करण्याची वेळ आली, असेही ते म्हणाले.