शहापुरच्या तहसीलदार निलीमा सुर्यवंशी यांच्या बदलीसाठी पत्रकारांचे उपोषण

मुरबाड: शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या मुजोर कारभाराविरोधात तालुक्यातील सर्व पत्रकार एकवटले असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तहसिलदार निलिमा सुर्यवंशी – थिटे यांचा निषेध व्यक्त करीत काळ्या फिती लावुन तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पत्रकारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात मोठ्या संख्येने पत्रकार सामील झाले असून समाजातील विविध स्तरातील व्यक्ती, सामाजिक संस्था व विविध राजकीय पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यानी पाठिंबा जाहीर केला आहे. 

कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात आलेले अपयश, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या धमक्या, तालुक्याचा मंदावलेला विकास,व तालुक्यातील पत्रकार,राजकीय सामाजिक कार्यकर्ते याना सन्मानाची वागणूक न देणाऱ्या शहापुरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या विरोधात शहापूर तालुक्यात रोष दिसून येतो. हा रोष पत्रकारांच्या उपोषणातुन स्पष्ट दिसून आला. तालुक्यातील सर्वच पत्रकार यावेळी उपस्थित होते.आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तालुक्याचे आमदार दौलत दरोडा,राष्ट्रवादीचे तालुका आध्यक्ष मनोज विशे, सभापती संजय निमसे,यांसहित  क्रांतिकारी पत्रकार संघ, ठाणे जिल्हा, शहापुर तालुका धर्मविर युवा प्रतिष्ठान, शहापुर तालुका आखिल भारतीय सरपंच परीषद, छावा क्रांतीकारी सेना, आमदार दौलत दरोडा, निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्था,खातीवली विकास आघाडी, कुणबी समाज सेवा संस्था, महाराष्ट्र नवनिर्माण  सेना, शहापुर नगर पंचायत नगराध्यक्षा रजनी शिंदे, भारतीय मानव विकास महासंघ,वंचित बहुजन आघाडी, ओबिसी  संघर्ष समीती,श्री समर्थ प्रतिष्ठाण, संभाजी बिग्रेड, निवासी कुणबी समाज मंडळ,इत्यादि संस्थांनी पत्रकारांच्या आंदोलनाला जाहिर पाठींबा पत्र दिले आहे.

आजच्या पहिल्या दिवशी किरण निचिते, लता गगे, वसंत पानसरे, आणि रमेश भेरे हे पत्रकार उपोषणास बसले आहेत.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत दररोज चार पत्रकार उपोषणास बसणार आहेत.