अर्थचक्र पुर्वपदावर आणण्यासाठी धाडसी निर्णयांची गरज -देवेंद्र फडणवीस

लॉकडाऊन करायचं की अनलॉक करायचं यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकच कराव लागणार आहे. कोरोनाशी लढताना अर्थचक्र पुर्वपदावर आणण्याबाबतचा विचार करावा लागेल. त्यासाठी योजना तयार करावी लागेल. पण सरकार तसा विचार करत असल्याचे दिसत नाही, असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने तज्ञांची समिती गठीत केली आहे. त्याचे अहवाल आले आहेत. त्यातील शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहीजे. आता थोडे धाडसी निर्णय घ्यायला लागणार आहेत. जे उद्योग चीनमधून बाहेर पडणार आहेत ते महाराष्ट्रात उद्योग करण्यास प्राधान्य देतील. कारण उद्योगामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोरोनानंतर सगळ्या क्षेत्रांचा विकास कसा करायचा याचे प्लॅनिंग करायला लागेल. तसेच त्यांनी कोरोनाबाबत असे म्हटले की, कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या आणि आयसोलेशनची सोय केल्यास कोरोनावर नियंत्रण आणता येईल, असेही फडणवीसांनी सांगितले.