तलासरीतील आदिवासी युवकाने फुलवला भाज्यांचा मळा

डहाणू: तलासरी(talasari) तालुक्यातील झाई ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत ब्राम्हणगावच्या नांगरपाड्यावरील प्रवीण गुजर(praveen gujar) या आदिवासी युवकाने बोरीगाव घाटालगतच्या डोंगरमाथ्यावर वेलवर्गीय भाज्यांचा मळा(vegetable farming) फुलवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला येथे आधुनिक शेतीचा प्रयोग राबवायचा आहे.

महाराष्ट्र गुजरात सीमेवर झाई बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायत असून ब्राह्मणगाव येथे प्रवीण आई-वडील, तीन भाऊ आणि एक बहीण या कुटुंबासोबत राहतो. बोरीगाव घाटानजीकच्या डोंगरमाथ्यावर शासनाकडून वनहक्क कायद्यातून ३ एकराचा वनपट्टा या कुटुंबाला मिळाला आहे. त्याचे वडील खरीप हंगामात भाजीपाला लागवड करायचे, मात्र खडकाळ जमिनीतून हाती काहीच लागत नव्हते. दरम्यान प्रवीणने कोसबाडच्या महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालयात नुकताच कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. येथे प्राप्त ज्ञानाचा वापर करीत, त्याने ४० गुंठ्यावर पडवळ, कारली, वालुक (काकडी) या वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली. त्यामुळे भरघोस उत्पादनाला सुरुवात झाली असून प्रतिदिन १०० किलो उत्पादन निघते. त्याची आई शांतीबाई या भाज्या सीमेलगतच्या उंबरगाव रेल्वे स्थानकानजीक विक्रीकरिता घेऊन जाते. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या असल्याने हातोहात त्याची विक्री होत असल्याचे त्या म्हणाल्या. मुलाला आवडीचे शिक्षण दिल्याने कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाल्याची समाधानाची भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

आदिवासी पावसाळ्यात डोंगर उतारावर शेती करतात त्यावेळी वालकाची लागवड केली जाते. वालुक (काकडीला) आदिवासी समाजाच्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा घटक असलेल्या वालका पासून दिवाळी सणात सावेली हा पदार्थ तयार केला जातो. हल्ली आदिवासी बांधव नोकरी-धंद्यानिमित्त शहरात वसला आहे, तर शिक्षित वर्ग नोकरीत रमल्याने शेतीपासून दूर चालला आहे. त्यामुळे समाजबांधवांमध्ये या पिकाची मागणी लक्षात घेता, वालुक लागवडीकडे वळल्याचे प्रवीण म्हणाला.

दरम्यान या डोंगरी शेतीवर वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी त्यांनी शासकीय योजनेतून शेततळ्याच्या लाभ घेतला आहे. येथे आधुनिक शेती, मशरूम लागवड, गांडूळखत निर्मिती प्रोजेक्ट त्याला राबवायचा आहे. जवळच बोर्डी हे सागरी पर्यटनस्थळ असून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या त्याच्या भावाला डोंगरमाथ्यावर कृषी पर्यटन केंद्र उभारायचे असल्याचा मनोदय प्रवीण याने बोलून दाखवला.

बाळासाहेब कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कोसबाड येथील या जनता विद्यालयात लेखीसह, तोंडी आणि प्रत्यक्षिकावर आधारित शिक्षण दिले जाते. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी स्वतःचा रोजगार उभा करण्यास सक्षम बनतो, हे प्रवीणच्या उदाहरणातूनही दिसते.
                                              –  चेतन उराडे, कृषी सहाय्यक, महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालय कोसबाड