सांंग सांग शिक्षण विभाग सुट्टी मिळेल काय ? शिक्षकांकडून होतेय नाताळच्या सुट्टीबाबत विचारणा

आठवड्याभरावर आलेल्या नाताळची सुट्टी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार का? (teachers curious about christmas holiday)असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. शिक्षण विभागाने नाताळच्या सुट्ट्यांबाबत स्पष्टता करावी, असे शिक्षकांचे मत आहे.

मुंबई: कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण(online education) सुरू आहे. ज्यामुळे शिक्षण विभागाकडून गणेशोत्सवामध्ये सुट्टी दिली नाही, तर दिवाळीमध्ये आठवडाभर सुट्टी देण्यात आली हाेती. त्यातच यंदा वार्षिक सुट्ट्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आठवड्याभरावर आलेल्या नाताळची सुट्टी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार का? (teachers curious about Christmas holiday)असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. शिक्षण विभागाने नाताळच्या सुट्ट्यांबाबत स्पष्टता करावी, असे शिक्षकांचे मत आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने १५ जूनपासून नियमितपणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले. शैक्षणिक वर्ष सुरू करताना विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय सरकारने केली. मात्र यंदा शैक्षणिक सत्रातील सुट्ट्यासंदर्भात सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शाळांकडून वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला नाही. यंदा गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली नाही, तर दिवाळीमध्ये प्रथम तीन दिवस सुट्टी देण्यात आली. परंतु पालकांनी राग व्यक्त केल्यानंतर ती सुट्टी आठवडाभर करण्यात आली.

दरम्यान, मुंबईतील अनेक माध्यमाच्या अनुदानित व खाजगी शाळांमध्ये दरवर्षी २३ डिसेंबरपासून १जानेवारीपर्यंत १० दिवस नाताळाची सुट्टी दिली जाते. मात्र यावर्षी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने गणेशोत्सव व दिवाळीच्या सुट्टीकडे दुर्लक्ष करणारे सरकार नाताळाची सुट्टी तरी जाहीर करेल का? किंवा शाळा प्रशासनांना आपल्या अधिकाराचा वापर करून ही सुट्टी देता येईल का? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

सुट्ट्यांमध्ये ऑनलाईन शिक्षण बंद राहतील हे लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांसाठी कोणतेही प्रशिक्षण, गैरशैक्षणिक काम किंवा विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही उपक्रमाचे नियोजन करू नये. तसेच शाळांनीही सुट्ट्यांमध्ये घटक चाचणीसारख्या परीक्षांचे आयोजन करु नये या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा,अशी मागणी टीचर्स डेमॉक्रॅटिक डेमॉक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी केली आहे.