कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

कल्याण : डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतात शिक्षक दिन(teacher`s day) साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये शिपायापासून ते मुख्याध्यापकांपर्यंतची भूमिका विद्यार्थी(student) निभावत असतात. शाळेची घंटा वाजवण्यापासून ते वर्गात शिकविणे विद्यार्थी आनंदाने शिक्षक दिन साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षक दिन साजरा करता आला नाही. सम्राट अशोक विद्यालयाने(samrat ashok school) मात्र गुगल मीटच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा केला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफाइड लाइफ कोच राजेंद्र जाधव उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, शाळा बंद असल्याने आपले आई-वडीलच गुरु आहेत. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिका मोबाईल गुरूच्या भूमिकेत आहे. ऑनलाइन लेक्चर ऐका आणि पहा. अनावश्यक मोबाईलचा वापर करू नका. आपल्या मध्ये खूप चांगले गुण असतात त्यांना वाव द्या. सतत प्रयत्नशील राहा यश मिळत असते, असेही म्हणाले.

मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, जर आपल्या घरात कोणी निरक्षर असेल तर त्यांना तुमच्या माध्यमातून साक्षर करा. त्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढवा. तसेच सम्राट अशोक शाळेला सुरुवात झाली तेव्हाचा प्रथम विद्यार्थी ज्याचा जनरल रजिस्टर वरील नंबर एक आहे असा संजय कदम प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होता. त्यानेही सांगितले मी दहावी नापास झालो परंतु शिक्षकांच्या संपर्कात होतो त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज रिझर्व्ह बँकेत नोकरीला आहे. माझा प्रयत्न मी सोडला नव्हता म्हणूनच नोकरी मिळाली. माझ्या गुरूंना विनंती आहे माझ्यासारख्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे आयुष्य घडवा. संस्था अध्यक्ष पी टी धनविजय यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार गणेश पाटील यांनी केले.