ठाकरे सरकारनेच मुंबई पोलिसांंची प्रतिमा केली मलीन, राम कदम यांचा आरोप

सुशांत सिंह प्रकरणावरून सध्या अनेक आरोप – प्रत्यारोप होत आहेत. त्यात आता भाजप नेते राम कदम यांनी उडी घेतली आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

सुशांत सिंह प्रकरणामध्ये भाजपने नुसते आरोप करू नयेत, पुरावे द्यावेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपल्या रोखठोक या सदरातही त्यांनी भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आणि लेखानंतर राम कदम यांनी राऊत आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारनेच मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह प्रकरण ठाकरे सरकार सीबीआयकडे का सोपवत नाही , असा प्रश्नही कदम यांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. हेही राम कदम यांनी नमूद केले.नव्या पिढीचे विचार समजून घ्यायला हवे, असे कदम म्हणाले. सुशांतच्या प्रकरणात त्याच्या वडिलांकडून बिहारमध्ये पोलीस तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशी व्हावी, असे राम कदम यांनी म्हटले आहे.