कशेडी घाटात चालत्या खाजगी बसमधून चोरी

पोलादपूर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या बसेसना कशेडी घाटात लुटण्याचा प्रकार झाला असल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच महामार्गावर असा प्रकार घडल्याने दिवस रात्र गस्त वाढवणे क्रमप्राप्त बनले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री २ .२५ च्या सुमारास विरारवरून गुहागरकडे जाणाऱ्या  एका खाजगी बसची घाटात धामणगावजवळ गती कमी झाल्यानंतर  बस लुटण्याचा प्रयत्न झाला. याबाबत पोलादपूर पोलीस स्थानकात आज सकाळी खबर देण्याचे व चोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कशेडी घाट परिसरात पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या परिसरात  रत्नागिरीकडून उस्मानाबादला जाणारे ट्रक महामार्गालगत उभे होते. यामध्ये एम एच १८ एम ९३०६  व एम एच १६ ए वाय २४४७ रात्री उभे होते. याच वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरकडे जाणारी पिंपलेश्वर ट्रॅव्हलची खासगी बस एम एच ०८ ई ९४७५ लुटण्याचा प्रयत्न केला असून सुमारे पन्नास हजार रुपयांचे सामान चोरले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

या टोळीतीळ  ६ पैकी उस्मानाबाद येथील रहिवासी आरोपी अशोक जाधव याला घटनास्थळी दरोडा प्रकरणी पकडण्यात आले असून अटक करण्यात आले आहे. तर ५ जण पळाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सपोनि. प्रशांत जाधव ,यांच्या समवेत दीपक जाधव, रुपेश पवार, विनोद महाडिक, गणेश किर्वे आदींनी तपासाची चक्रे गतीने फिरवत बंदोबस्त ठेवला आहे.