दूध दरवाढीच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा १३ ऑगस्टला सुरु होणार

विरोधकांचे दूध दरवाढीचे तिसरे आंदोलन राज्यात १३ ते २८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच लाख पत्र पाठवणार असल्याचे समजते. प्रति लिटर १० रुपये आणि ५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत किंवा शेतकऱ्यांकडचे गायीचे दूध ३० रुपये दराने खरेदी करावे अशी मागणी आहे. आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली.

या अगोदर दूध दरवाढीबाबतचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर १ ऑगस्टला दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर दूध दराविषयीच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यानंतर खोत यांनी पत्रकार परिषदेत  १३ ते २८ ऑगस्ट दरम्यानच्या आंदोलनाविषयी माहिती दिली.