gutkha

पेण: पेण तालुक्यातील सर्वच व्यावसायिकांवर लॉकडाउनच्या काळात संक्रांत आलेली असताना गुटखा विक्रेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने सुगंधित गुटखा, विमल पान मसाला आदी उत्पादने पानपट्टी किंवा किराणा मालाच्या दुकानात विक्री करण्यास बंदी लादलेली असूनदेखील पेण व वडखळ येथे व तालुक्यातील नाक्यानाक्यावर आणि पानपट्ट्यांमध्ये ही विक्री होत असल्याने पोलीस प्रशासन आणि अन्न सुरक्षा कार्यालयाची उदासीनता यातून दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही गुटखा आणि विमल पान मसाला विक्री चढ्या दराने देखील होत असल्याने यावर संबंधित प्रशासन बंधने का घालत नाहीत आणि राज्य शासनाने बंदी घातलेली असूनही  विक्रेते विक्री कसे करीत आहेत? यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? असा सवाल आता पेणमधील नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे या अशा कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन आणि अन्न औषध कार्यालयाने वेगळ्या पद्धतीने धाड टाकून कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गुटखा विक्री जर पेणमध्ये होत असेल तर आता पोलीस प्रशासनाला देखील कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू असतील तेथे आम्ही आणि पोलीस प्रशासन नक्कीच जाऊन कारवाई करू.                                                                                                                 –  ल. अ. दराडे – अधिकारी, अन्न औषध प्रशासन