राज्य सरकारच्या निर्णयावर व्यापाऱ्यांची नाराजी : वाचा सविस्तर

  संपूर्ण राज्यात व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊनचा निर्णय सरकारने रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले आहे.

  दरम्यांन बारामती मध्येही व्यापाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या निर्णँयावर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर काल बारामतीमध्ये जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी नव्याने आदेश लागू केले होते, मात्र त्यामध्ये देखील आवश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश होते,तरीदेखील आज सकाळी अचानक बारामती बंदचे आदेश निघाले. अधिकाऱ्यांनी एका क्षणात बारामती बंद केली. संपूर्ण बारामती बंद झाल्याने व्यापारी नाराज झाले असून,राज्य सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णयांमध्ये अनेक वेळा बदल झाला रात्री उशिरापर्यंत तीन वेळा आदेश आले.व आज सकाळी अचानक बारामती संपूर्ण बंद करण्यात आली.या घटनेमुळे व्यापारी हडबडून गेले.

  लॉकडाऊन करायचे होते तर पूर्ण करायचे होते. तर रस्त्यावर एक जण फिरणार नाही,याची काळजी घ्यायला पाहिजे होती. फक्त दुकानदारांची दुकाने बंद करून नेमके काय साधले जाणार आहे?असा प्रश्न व्यापारी महासंघाने केला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  पंढरपूरात आज व्यापारी विरुद्ध प्रशासन संघर्ष

  शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी केल्यानंतर, आता गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, पण उद्या आपण दुकाने उघडणारच, असा आक्रमक पवित्रा पंढरीतील व्यापारी महासंघाने घेतला आहे. यामुळे पंढरपुरात आज दि.७ रोजी प्रशासन विरूध्द व्यापारी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्य शासनाने अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डाऊन सदृश्य परिस्थिती जाहीर करून व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे पंढरपुरातील व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. या निर्णयावर नाराजी करत व्यापारी महासंघाने महासंघाचे अध्यक्ष भट्टड यांच्या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत या निर्णयाला विरोध करण्याचे धोरण ठरवण्यात आले. व्यापारी महासंघाची बैठक सुरू असतानाच आपली प्रचारसभा सोडून आ.परिचारक व इतर भाजपाची मंडळी बैठकी पोहोचली. त्यांनी व्यापाऱ्यांच्या भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कनावर घातल्या. यावेळी फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. मात्र व्यापाऱ्यांनी यानंतर देखील उद्या दिनांक ७ रोजी आपली दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश झुगारून कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, परंतु आपण आपली दुकाने उघडणार यावर व्यापारी ठाम आहेत. व्यापारी व प्रशासनातील या संघर्षाला नेमके काय वळण लागते, हे आज स्पष्ट होईल.

   शाहूपुरी पोलिसांनी बंद केली दुकाने

  जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लागू केलेल्या निर्बंधाच्या विरोधात मंगळवारी व्यापारी आक्रमक झाले . भवानी पेठेतील मोती चौकात काही व्यापाऱ्यांनी हे नियम झुगारत दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच शाहूपुरी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला . ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा कडक नियम लागू झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मिनी लॉक डाऊनच्या विरोधात आक्षेप नोंदविला .

  जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सातारा जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू करून अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने ब बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . या बाजारपेठेत मिठाई , बेकरी दुग्धालय , यांना सूट देण्यात आली आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या कठोर नियमाच्या विरोधात कापड व्यावसायिक, इतर दुकानदारांची मंगळवारी सकाळीच तीव्र प्रतिक्रिया आली . मोती चौकात राजपथावरील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या निर्बंधांचा निषेध केला . काही दुकानदारांनी सकाळी नऊ वाजताच चक्क दुकाने उघडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला . मात्र चौकात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ जाऊन दुकाने बंद केली साताऱ्यात भाजीमंडई वगळता इतर सर्व व्यापारी वर्तुळात प्रचंड शांतता होती . साताऱ्यात बंदचा परिणाम म्हणून रोजची वाहतूक सुध्दा तुरळक च होती . शाळा मंदिरे बाजारपेठा बंद राहिल्याने राजपथ कर्मवीर पथ राधिका रोडवर सकाळपासूनच सामसूम जाणवत होती .

  ही तर नियमांची मोगलाई – शिवेंद्र राजे

  साताऱ्याचा व्यापारी वर्ग करोनाच्या दुष्ट चक्रातून सावतोय . त्यामुळे पुन्हा कठोरपणे निर्बंध लादण्याचा प्रकार म्हणजे मोगलाई सुरू असल्याची सणसणीत टीका सातारा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली . ते म्हणाले प्रशासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली आहे मात्र त्यांना कच्चा माल पुरवणारी दुकाने मात्र बंद आहेत अशा परवानगीचा उपयोग नाही . आठवड्यातून दोन दिवव लॉक डाऊन दंडात्मक कारवाई इतर नियम याला सुध्दा व्यापारी प्रशासनाला सहकार्य करावयास तयार आहेत . ज्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुकानात माल भरलाय त्यांनी ऐन सणासुदीत नियम म्हणून दुकाने बंद ठेवायची , हा कसला न्याय जी दुकाने सुरू आहेत तेथे गर्दी झाल्यास करोना संक्रमणाची भीती नाही काय ? मग व्यापारी वर्गाने असे काय केले आहे ? ही तर सरळ सरळ नियमांच्या निमित्ताने केलेली मोगलाई असल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली .