भिवंडीत नागाव रोडच्या अर्धवट कामामुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त 

भिवंडी: भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या अर्थ सहाय्यातून १२ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. मात्र त्यातील बहुसंख्य कामे अर्धवट तर काही ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने वाहन चालकांसह प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बेजबाबदार व निकृष्ट कामांबाबत महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाई करून प्रवाशी व वाहन चालकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे भिवंडी शहराध्यक्ष अनंत पाटील यांनी केली आहे.

एसटी स्थानक ते नागाव,गायत्रीनगर या ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत राहिले आहे. त्यामुळे पावसामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या रस्त्यावरील वाहन चालक व प्रवासी बेजार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद होता मात्र आता अनलॉकमध्ये अटी शर्थीचे नियम लागू करून प्रवाशी रिक्षा सुरू केल्या आहेत. मात्र नागांव रोडच्या दुरावस्थेमुळे रिक्षा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिका प्रशासनाने या रस्त्यावरील दुरुस्ती व उर्वरित काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे भिवंडी शहराध्यक्ष अनंत पाटील यांनी केली आहे.